आतापर्यंत ज्या काही वेस्टर्न मुव्हीज पाहिल्या आहेत त्यांच्यावरून वेस्टर्न मुव्हीजचा विचार करताना एक टिपिकल पॅटर्न डोक्यात येतो,ज्यात सतत घोडदौड करणारे,बूट्स आणि हॅट घातलेले काऊबॉईज,मैलोनमैल पसरलेली माळरानं,काही कारणामुळे दोन ग्रुप्स मध्ये असणारी स्पर्धा,अगदी रक्तरंजित हाणामारी वगैरे.
असाच वेस्टर्न बॅकग्राउंड असलेला पण चित्रपटाची कथा,त्यातली पात्रं यामुळे अगदी वेगळाच वाटेल असा एक चित्रपट नुकताच पहिला तो म्हणजे 'द पॉवर ऑफ द डॉग'.ट्रेलर बघताना काही कल्पना येत नाही, किंबहुना चित्रपटाची सुरुवात होतानाही पण पुढे काय घडेल याचाही अंदाज येत नाही.
कथा १९२५ मधली मोन्टाना मधल्या दोन भावांपासून सुरु होते . मोन्टाना मधल्या एका मोठ्या रँचचे मालक असलेले फिल (बेनेडिक्ट कम्बरबॅच ) आणि जॉर्ज(जेस प्लेमोन्स) हे दोघे भाऊ ,एकमेकांहून पूर्णपणे वेगळे.
फिल हा येल युनिव्हर्सिटीत शिकलेला,ग्रीक आणि लॅटिन भाषेत पारंगत असा रूढार्थाने सुसंकृत असतो पण त्याचं राहणीमान त्याच्या बॅकग्राउंडपेक्षा पूर्णपणे भिन्न असत .पेहरावापासून ते दिवसाच्या रुटीनपर्यंत रँच वर पूर्णवेळ काम करणाऱ्या एखाद्या काऊबॉयसारखाच तो राहत असतो,तो त्याच्याकडे काम करणाऱ्या इतर १०-१२ काऊ बॉईज सारखा घोड्यावर सतत वावरत असतो. गुरांची देखरेख करणे,त्यांची काळजी घेणे इ. पासून ते त्या जनावरांच्या कातडीच्या दोऱ्या (हाईड्स )करण्यासारखी सगळी काम करत असतो.तो त्यांच्यापैकीच एक असल्याप्रमाणे राहत असल्याने त्यांचा म्होरक्याही असतो.फिलच्या बोलण्यात,गप्पांमध्ये सतत त्याच्या एका मेंटॉरचा उल्लेख असतो आणि ग्रुप मधल्या इतरांना त्याने स्वतः मेंटॉर कडून शिकलेले धडे देत असतो. हे सोडलं तर फिलचं वागणं ,बॉडी लँग्वेज ,चालायची पद्धत सगळीच एखाद्या गर्विष्ठ आणि उद्धट माणसासारखी असते.त्याला न पटणाऱ्या माणसाशी ,अगदी स्वतःच्या भावाशीही त्याचं वागणं तुसडेपणाचं किंवा दुष्टपणाचं वाटावं इतपत टोकाचं असतं .
याच्या उलट त्याचा भाऊ जॉर्ज तत्कालीन श्रीमंत माणसाला शोभेल असा पेहराव करणारा ,आदबशीर वागणारा आणि बोलणारा असतो.फारसा हुशार नसलेला ,भावाच्या वागण्यानी दबून असलेला पण तरीही त्याच्याशी जुळवून घेणारा असा जॉर्ज आयुष्यात एकाकीपणाला कंटाळलेला असतो त्याच सुमारास त्याला रोझ गॉर्डन भेटते. रोझ कॅटल ड्राइव्ह वर असलेल्या एका गावात छोटसं डायनर (रेस्टोरंट) चालवत असते ,तिचा कॉलेजवयीन तरुण मुलगा पीटर तिला तिच्या कामात मदत करत असतो.
कॅटल ड्राइव्हचा रेफरन्स नीट कळण्यासाठी थोडा त्याचा इतिहास चाळला. कॅटल ड्राइव् म्हणजे गुरांना रँच पासून जवळच्या विक्रीच्या ठिकाणापर्यंत नेण्याचा मार्ग.रेल्वे लाईन्सच जाळं येण्यापूर्वी रँचचे मालक आपल्या रँच मधली विक्रीसाठी तयार झालेली जनावरं घेऊन त्यांच्या विक्रीच्या ठिकाणापर्यंत पायी नेत असतं. तेव्हा रँच मधून निघून रोज काही मैलांची पायपीट करत आठवडा किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ जनावरं चालत न्यावी लागत असल्याने ती विक्रीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांचं वजन कमी न होऊ देणे हे फार महत्वाचे असे कारण ही जनावर मुख्यतः मांसासाठी विकली जात असत.
पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा रेल्वे लाईन्सच जाळं भरपूर पसरलं गेलं तेव्हा कॅटल ड्राइव्ह चा कालावधी कमी कमी होत गेला कारण आता कॅटल ड्राइव्ह म्हणजे जनावरांना रँच पासून नजीकच्या ट्रेन स्टेशनपर्यंत इतकाच राहिला.तरीही ही जनावरं मुख्यतः मांस विक्रीकरता असल्याने रोज रात्री मधल्या सोयीस्कर जागी मुक्काम करत गुरांनां व्यवस्थित चारापाणी देत ,त्यांचं वजन कमी न होऊ देता ट्रेन स्टेशनपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं काम काऊबॉईज करायचे. ही मधली मुक्कामाची ठिकाणं/छोटी गावं म्हणजे कॅटल टाऊनस जी कॅटल क्रॉसरोड्स वर असायची. अशा छोट्या गावांमध्ये एक दोन रेस्ट्रॉरंटस ,सलोन इ आवश्यक सुविधा व्यवस्था असे.
तर अशाच एका गावात आपल्या मुलासोबत पीटर सोबत एक छोटस रेस्टोरंट चालवणारी रोझ एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची असते. पीटर हे कथेतलं चौथं पात्रं. संवेदनशील स्वभावाचा ,दिसायला नाजूक ,वावरण्यातही बायकांसारखा वाटू शकेल इतपत नाजूकपणा असल्याने एकदा तिथे जेवायला आलेल्या फिल आणि त्याच्या ग्रुपला चिडवायला आणि त्रास द्यायला सावजाप्रमाणे गवसतो.
पुढच्या घटनाक्रमात जॉर्ज आणि रोझ लग्न करतात आणि पीटर रोझ बरोबर फील आणि जॉर्ज च्या रँच वर जातो.इथपर्यंतची गोष्ट बरीच स्लो आहे,थोडी कंटाळवाणीही वाटू शकेल. रँच वर आलेल्या रोझसोबत फिल आपल्या मूळच्या दुष्टपणाला सुसंगत आणि भावापासून स्वतःला दूर केल्याचा राग म्हणून किंवा काहीतरी अनामिक दुखऱ्या आठवणीने अधिकच दुष्टपणाने वागू लागतो .
फिल असाच या दोघांशी दुष्टपणे वागत राहील आणि सिनेमाचा शेवट दु:खी असेल असा प्रेडिक्टेबल पॅटर्न आपल्या डोक्यात येत असताना सिनेमाला वेगळंच वळण लागतं,रँच भोवतालच्या माळरानावर भटकत असलेल्या पीटरचं नकळत फिलसोबत बॉण्डिंग होतं. फिलने स्वतःच्या तरुण वयात त्याच्या मेंटॉरकडून ,ब्रोन्को हेन्री कडून जे जे शिकलेलं असतं ते सगळं तो पीटरला शिकवू लागतो.त्यात घोडेस्वारी पासून ते जनावरांच्या कातडीच्या दोऱ्या करण्यापासून ते आयुष्याची फिलॉसॉफी शिकवण्यापर्यंत.
या पॉईंट नंतरचा पिक्चर म्हणजे एखाद्या स्पायरलसारखा आणि चकित करणारा आहे ,ज्याचा शेवट बरा आहे की वाईट हे आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून आहे आणि तो बघण्यातच खरी गम्मत आहे.
खरं तर पहिल्या सीन पासून प्रत्येक पात्राच्या डायलॉगमध्ये ,इतर लहानसहान डिटेलिंगमुळे गोष्टीतील जे सिक्रेट आपल्यासमोरच असतं पण ते तितकं महत्वाचं असेल का याचा विचार चित्रपट संपल्यानंतर आपण करायला लागतो. ही एक साधी सरळ कथा असू शकते ज्यात काही योगायोग येतात आणि संधी मिळताचं काही पात्रं तिचा फायदा घेतात ,हेही असू शकेल . किंवा ही व्यवस्थित विचार आणि योग्य आखणी करून केलेली गोष्ट असावी ,ज्यात एक पात्र इतरांना न टाळता येणाऱ्या शेवटाकडे घेऊन जातं.अशा किंवा इतरही शक्यतांचा प्रेक्षकांना विचार करायला लावू शकणाऱ्या ओपन टू इंटरप्रिटेशन वाटू शकेल अशा शेवटामुळे चित्रपट संपल्यावर पुन्हा एकदा नीट,कोणतेही छोटे डिटेल्स मिस न करता पाहायची इच्छा होते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे कथा आणि एकंदर चित्रपटाची ट्रीटमेंट स्लो असल्याने सुरुवातीचा तासभर काही घडतंय असं वाटत नाही पण त्यानंतरही अजून थोडावेळ उत्सुकता टिकवून ठेवली तर मात्र प्रत्येक पात्राचं आणि प्लॉटचं उलगडत जाणं हळूहळू आपल्याला त्यात एंगेज करतं . मोन्टानाची भूरुपं , विस्तीर्ण माळरानं ,डोंगर (जे न्युझीलंड मध्ये शूट केलय), लँडस्केप जो अनफरगिविंग वाटतो ,ते सगळे कथेच्या तीव्रतेत भर घालतात.
फिलची खूप लेअर्स असलेली ग्रे शेडची व्यक्तिरेखा कंबरबॅचनी खूप ताकदीने उभी केलीय.फिलचा पहिल्या फ्रेमपासूनच खलनायकी भासणारा वावर ,एकीकडे केवळ बोलण्यानेही समोरच्या व्यक्तीला मानसिक पातळीवर आघात करू शकेल इतका तुसडेपणा तर दुसरीकडे स्वतःबद्दलचा अनाकलीय अपराधीपणा त्याच्या प्रत्येक एक्सप्रेशनमुळे अधिक गहिरा होतो. त्याच्याकडे काऊबॉईजचं म्होरकेपण आहे पण तो मनाने त्यांच्यातला नाही, विचाराने त्यांच्यापेक्षा वेगळा आहे,भावाच्या सर्वसामान्य व्यक्तिरेखेपेक्षा जास्त हुशार आहे म्हणूनच की काय एकटा आहे.त्याची माचो इमेज ,त्याला ज्या गोष्टींचा अभिमान आहे, त्या खरंच त्याच्या स्वतःच्या आवडीच्या आहेत की त्याच्या नकळत या गोष्टींवर विश्वास ठेवायला त्याला गॅसलाईट केलं गेलंय ,यामुळे आतून गोंधळला आहे तर बाहेरून तुसडा आहे ,असा विविध कंगोरे असलेला आणि वेगवेगळी वळण घेत जाणारा कॅरेक्टर ग्राफ कम्बरबॅचने खूप ताकदीने उभा केलाय . कदाचित हा रोल त्याला यंदाचं ऑस्करही मिळवून देऊ शकेल.
Kirsten Dunst नी उभी रोझ सुरुवातीला स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ,विचारांची ,कलात्मकता आवडणारी ते विचित्र परिस्थितीत कोलमडून पडणारी तरीही पूर्णपणे हार न पत्करणारी स्त्री खूप सुंदर उभी केलीय. एका छोट्याशा प्रसंगात जी जॉर्जला डान्स करायला शिकवते त्यात तिची सकारात्मकता खूप सुंदरतेने समोर येते
पण सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो Kodi Smit-Mcphee चा पीटर. प्रेडिक्टेबल होऊ शकेल असा रोल जेव्हा शेवटी सरप्राईज एलिमेंट बनतो तेंव्हाचे त्याचे सीन्स फारच अप्रतिम आहेत. ज्या चित्रपटाच्या पहिल्या वाक्यातच कथेचं फोरशॅडोइंग केलंय,अशा गोष्टीची परिणमकारकरता शेवटच्या दृश्यापर्यंत टिकवून ठेवणे केवळ त्याच्या अभिनयामुळे शक्य होतं.
यंदा ऑस्कर साठी १२ नामांकन मिळालेल्या या चित्रपटाला बेस्ट डायरेक्टर या कॅटेगरीतही नॉमिनेमश मिळालं आहे .आणि दुसऱ्यांदा नॉमिनेशन मिळालेल्या 'जेन काम्पियन' पहिल्याच स्त्री डायरेक्टर असाव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा