बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

पोस्टमेन इन द माउंटन्स (world cinema)


 

संवादाची अनंत माध्यमे असताना उपलब्ध असण्याच्या सध्याच्या जमान्यात पत्रं आणि ती पोहोचवणारा पोस्टमन दुर्मिळ होतोय. याचं पोस्टमनला केंद्रस्थानी ठेऊन बनवलेला एक चायनीज चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला, द पोस्टमन इन द माऊंटन नावाचा.चित्रपटाची गोष्ट  साधीशीचं ;चीन मधल्या हुनान पर्वतराजीतल्या छोट्या  गावांत पत्र पोचवणाऱ्या एका पोस्टमनची आणि त्याच्या तरुण मुलाची.


हा पोस्टमन आयुष्यभर डोंगरातून चढउतार करत, पायी चालत छोट्या छोट्या गावात पत्रं वाटत आलाय.ही गावं अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली असतात,जिथे जायला थेट रस्ताही नसतो,त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायी चालत पत्रांचा बटवडा करणे हे काम त्याने अतिशय प्रामाणिकपणे केलंय. ह्या पर्वत भागात सततच्या चढउतार करण्याने त्याला गुडघेदुखी सुरू होते आणि तो निवृत्त होणार असतो,त्याच्या जागी त्याच्या तरुण मुलास घ्यावे असं तो सुचवतो.


चित्रपट सुरू होतो तेंव्हा त्याचा मुलगा पत्रं वाटायच्या पहिल्या प्रवासास निघालाय आणि त्याला रस्त्याची,कामाची ओळख करून द्यावी म्हणून पोटमन वडीलही सोबत निघतो.सोबतीला त्याचा नेहमीचा सोबती कुत्राही घेतो.अशा या वडील आणि मुलाच्या प्रवासाची गोष्ट हा चित्रपट उलगडतो.
आठवड्याचे चार दिवस पाठीशी पत्राचं भलंमोठं गाठोडं बांधायचं,उंचच्या उंच डोंगर चढून जायचा,त्यावरच्या प्रत्येक गावात पत्रं पोहोचवायची ,नवीन पत्रं गोळा करून, पुन्हा तो डोंगर उतरून खाली गावात यायचं ,हे काम करण्याबद्दल मुलगा फार उत्सुक नसतो,तर वडील त्याला कामाची माहिती देण्यास प्रचंड उत्साही असतो.
पण हा केवळ त्यांच्या कामाचं स्थित्यंतर एवढाच प्रवास नसतो तर  वडील आणि मुलाचं नातं उलगडणार प्रवास आहे.पोस्टमनच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला कधी मुलासोबत निवांत वेळ घालवता आलेला नसतो,आणि मुलालाही आपल्या वडीलांबद्दल फार माहिती नसते,ह्या प्रवासात ते एकमेकांना नीट ओळखू लागतात,त्यांच्यातले परस्परांबद्दल असलेले गैरसमज दूर होतात.
त्यांना वाटेत भेटणारी गावं, त्यातली साधी माणसं, त्यांचं राहणीमान,पोस्टमन बद्दल जगाशी जोडणारा एकमेव दुवा म्हणून असणारं कौतुक तसेच पोस्टमनचं आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन गावकऱ्यांना मदत करणं फार सुंदरपणे समोर येतं.
वडील आणि मुलाच्या गप्पातून दोन पिढ्यांच्या विचारातला फरक नेमकेपणाने दिसतो.मी क्षणभर विसरूनच गेले की आपण परदेशी सिनेमा पाहतोय ,इतकं प्रातिनिधिक विचार होता तो.जुन्या पिढीचा सचोटीचा पराकोटीचा आग्रह,तर नवीन पिढीची व्यावहारिकता,वेगाचं वेड,असं सगळं त्यांच्या गप्पांतून उलगडत जातं. वडील आणि मुलाला जोडणारा एकमेव दुवा म्हणजे त्या पोस्टमनची बायको,तिची गोष्ट,तिचा आयुष्यभराचा संघर्ष हेही त्यांच्या गप्पातून भेटतं.


लक्षात राहण्यासारखे बरेच प्रसंग आहेत ह्या सिनेमात,त्यातला एक प्रसंग म्हणजे जोराचा वारा येऊन पत्रं उडायला लागतात आणि पोस्टमन जिवाच्या आकांताने ती गोळा करायला धावू लागतो,तेंव्हा त्याच्या मुलाला जाणीव होते की हे फक्त वडिलांचं काम नव्हतं तर हे त्यांचं आयुष्य होतं, म्हणूनच बहुतेक स्वतःचा वारसा पुढे चालवायला त्याने  आपल्या मुलाची निवड केलीय.


दुसरा प्रसंग म्हणजे,वाटेत त्यांना एक नदी लागते, ती पार करायला मुलगा वडिलांना पाठकुळी घेतो आणि नदी पार करतो,तेंव्हा वडीलाला जाणीव होते की आपला मुलगा आपल्या नकळत मोठा आणि जबाबदार झालाय.
ह्या कथेच्या बॅकड्रॉपला असलेल्या चीन मधल्या दुर्गम पर्वतराजीची चित्रीकरण अफाट सुंदर झालय,सिनेमात कुठेच मेलोड्रामा नसल्याने आपण एखाद्या खऱ्याखुऱ्या वडील मुंलाच्या जोडी सोबत प्रवासास निघालोय अशी जाणीव होतं राहते.
सिनेमात कुठेही कालखंडाचा उल्लेख नाहीय पण रेडिओवर ऐंशीच्या दशकातील पॉप सॉंग ऐकू येत,तोच कालखंड असावा, तीच गोष्ट त्यांच्या नावांची. सिनेमात कुठेही पोस्टमनचं आणि त्याच्या मुलाचं नाव येत नाही.आवश्यक नसलेले डिटेल्स टाळण्याचा हे वेगळेपणही सिनेमा नेटका बनवतं.
एक अतिशय साधा पण सुंदर सिनेमा पाहिल्याचं समाधान हा चित्रपट पाहताना मिळालं.


--------------------------------------------
मित्रमंडळ कट्टा बंगलोर च्या ब्लॉग वर पूर्वप्रकाशित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा