सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

द पॉवर ऑफ द डॉग (२०२१ - नेटफ्लिक्स )

आतापर्यंत ज्या काही वेस्टर्न मुव्हीज पाहिल्या आहेत त्यांच्यावरून वेस्टर्न मुव्हीजचा विचार करताना एक टिपिकल पॅटर्न डोक्यात येतो,ज्यात सतत घोडदौड करणारे,बूट्स आणि हॅट घातलेले काऊबॉईज,मैलोनमैल पसरलेली माळरानं,काही कारणामुळे दोन ग्रुप्स मध्ये असणारी स्पर्धा,अगदी रक्तरंजित हाणामारी वगैरे. 

असाच वेस्टर्न बॅकग्राउंड असलेला पण चित्रपटाची कथा,त्यातली पात्रं यामुळे अगदी वेगळाच वाटेल असा एक चित्रपट नुकताच पहिला तो म्हणजे 'द पॉवर ऑफ द डॉग'.ट्रेलर बघताना काही कल्पना येत नाही, किंबहुना चित्रपटाची सुरुवात होतानाही  पण पुढे काय घडेल याचाही अंदाज येत नाही. 

कथा १९२५ मधली मोन्टाना मधल्या दोन भावांपासून सुरु होते . मोन्टाना मधल्या एका मोठ्या रँचचे मालक असलेले  फिल (बेनेडिक्ट कम्बरबॅच ) आणि जॉर्ज(जेस प्लेमोन्स) हे दोघे भाऊ ,एकमेकांहून पूर्णपणे वेगळे. 

फिल हा येल युनिव्हर्सिटीत शिकलेला,ग्रीक आणि लॅटिन भाषेत पारंगत असा रूढार्थाने सुसंकृत असतो पण त्याचं राहणीमान त्याच्या बॅकग्राउंडपेक्षा पूर्णपणे भिन्न असत .पेहरावापासून ते दिवसाच्या रुटीनपर्यंत  रँच वर पूर्णवेळ काम करणाऱ्या एखाद्या काऊबॉयसारखाच तो  राहत असतो,तो त्याच्याकडे काम करणाऱ्या इतर १०-१२ काऊ बॉईज सारखा घोड्यावर सतत वावरत असतो. गुरांची देखरेख करणे,त्यांची काळजी घेणे इ. पासून ते त्या जनावरांच्या कातडीच्या दोऱ्या (हाईड्स )करण्यासारखी सगळी काम करत असतो.तो त्यांच्यापैकीच एक असल्याप्रमाणे राहत असल्याने त्यांचा म्होरक्याही असतो.फिलच्या बोलण्यात,गप्पांमध्ये सतत त्याच्या एका मेंटॉरचा उल्लेख असतो आणि ग्रुप मधल्या इतरांना त्याने स्वतः मेंटॉर कडून शिकलेले धडे देत असतो.  हे सोडलं तर फिलचं वागणं ,बॉडी लँग्वेज ,चालायची पद्धत सगळीच एखाद्या गर्विष्ठ आणि उद्धट माणसासारखी असते.त्याला न पटणाऱ्या माणसाशी ,अगदी स्वतःच्या भावाशीही त्याचं वागणं तुसडेपणाचं किंवा दुष्टपणाचं वाटावं इतपत टोकाचं असतं . 

याच्या उलट त्याचा भाऊ जॉर्ज तत्कालीन श्रीमंत माणसाला शोभेल असा पेहराव करणारा ,आदबशीर वागणारा आणि बोलणारा असतो.फारसा हुशार नसलेला ,भावाच्या वागण्यानी दबून असलेला पण तरीही त्याच्याशी जुळवून घेणारा असा जॉर्ज आयुष्यात एकाकीपणाला कंटाळलेला असतो त्याच सुमारास त्याला रोझ गॉर्डन भेटते. रोझ कॅटल ड्राइव्ह वर असलेल्या एका गावात छोटसं डायनर (रेस्टोरंट) चालवत असते ,तिचा कॉलेजवयीन तरुण मुलगा पीटर तिला तिच्या कामात मदत करत असतो. 

कॅटल ड्राइव्हचा रेफरन्स नीट कळण्यासाठी थोडा त्याचा इतिहास चाळला. कॅटल ड्राइव् म्हणजे गुरांना रँच पासून जवळच्या विक्रीच्या ठिकाणापर्यंत नेण्याचा मार्ग.रेल्वे लाईन्सच जाळं येण्यापूर्वी रँचचे मालक आपल्या रँच मधली विक्रीसाठी तयार झालेली जनावरं घेऊन त्यांच्या विक्रीच्या ठिकाणापर्यंत पायी नेत असतं. तेव्हा रँच मधून निघून रोज काही मैलांची पायपीट करत आठवडा किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ जनावरं चालत न्यावी लागत असल्याने ती विक्रीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांचं वजन कमी न होऊ देणे हे फार महत्वाचे असे कारण ही जनावर मुख्यतः मांसासाठी विकली जात असत. 

पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा रेल्वे लाईन्सच जाळं भरपूर पसरलं गेलं तेव्हा कॅटल ड्राइव्ह चा कालावधी कमी कमी होत गेला कारण आता कॅटल ड्राइव्ह म्हणजे जनावरांना रँच पासून नजीकच्या ट्रेन स्टेशनपर्यंत इतकाच राहिला.तरीही  ही जनावरं मुख्यतः मांस विक्रीकरता असल्याने रोज रात्री मधल्या सोयीस्कर जागी मुक्काम करत गुरांनां व्यवस्थित चारापाणी देत ,त्यांचं वजन कमी न होऊ देता ट्रेन स्टेशनपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं काम काऊबॉईज करायचे. ही मधली मुक्कामाची ठिकाणं/छोटी गावं म्हणजे कॅटल टाऊनस  जी कॅटल क्रॉसरोड्स वर असायची. अशा छोट्या गावांमध्ये एक दोन रेस्ट्रॉरंटस ,सलोन इ आवश्यक सुविधा व्यवस्था असे.

तर अशाच एका गावात आपल्या मुलासोबत पीटर सोबत एक छोटस रेस्टोरंट चालवणारी रोझ एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची असते. पीटर हे कथेतलं चौथं पात्रं. संवेदनशील स्वभावाचा ,दिसायला नाजूक ,वावरण्यातही बायकांसारखा वाटू शकेल इतपत नाजूकपणा असल्याने एकदा तिथे जेवायला आलेल्या फिल आणि त्याच्या ग्रुपला चिडवायला आणि त्रास द्यायला सावजाप्रमाणे गवसतो. 

पुढच्या घटनाक्रमात जॉर्ज आणि रोझ लग्न करतात आणि पीटर रोझ बरोबर  फील आणि जॉर्ज च्या रँच वर जातो.इथपर्यंतची गोष्ट बरीच स्लो आहे,थोडी कंटाळवाणीही वाटू शकेल. रँच वर आलेल्या रोझसोबत फिल आपल्या मूळच्या दुष्टपणाला सुसंगत आणि भावापासून स्वतःला दूर केल्याचा राग म्हणून किंवा काहीतरी अनामिक दुखऱ्या आठवणीने अधिकच दुष्टपणाने वागू लागतो .

फिल असाच या दोघांशी दुष्टपणे वागत राहील  आणि सिनेमाचा शेवट दु:खी असेल असा प्रेडिक्टेबल पॅटर्न आपल्या डोक्यात येत असताना सिनेमाला वेगळंच वळण लागतं,रँच भोवतालच्या माळरानावर भटकत असलेल्या पीटरचं नकळत फिलसोबत बॉण्डिंग होतं. फिलने स्वतःच्या तरुण वयात त्याच्या मेंटॉरकडून ,ब्रोन्को हेन्री कडून जे जे शिकलेलं असतं ते सगळं तो पीटरला शिकवू लागतो.त्यात घोडेस्वारी पासून ते जनावरांच्या कातडीच्या दोऱ्या करण्यापासून ते आयुष्याची फिलॉसॉफी शिकवण्यापर्यंत. 

या पॉईंट नंतरचा पिक्चर म्हणजे एखाद्या स्पायरलसारखा आणि चकित करणारा आहे ,ज्याचा शेवट बरा आहे की वाईट हे आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून आहे आणि तो बघण्यातच खरी गम्मत आहे.

खरं तर पहिल्या सीन पासून प्रत्येक पात्राच्या डायलॉगमध्ये ,इतर लहानसहान डिटेलिंगमुळे गोष्टीतील जे सिक्रेट आपल्यासमोरच असतं पण ते तितकं महत्वाचं असेल का याचा विचार चित्रपट संपल्यानंतर आपण करायला लागतो. ही एक साधी सरळ कथा असू शकते ज्यात काही योगायोग येतात आणि संधी मिळताचं काही पात्रं तिचा फायदा घेतात ,हेही असू शकेल . किंवा ही व्यवस्थित विचार आणि योग्य आखणी करून केलेली गोष्ट असावी  ,ज्यात एक पात्र इतरांना न टाळता येणाऱ्या शेवटाकडे घेऊन जातं.अशा किंवा इतरही शक्यतांचा प्रेक्षकांना विचार करायला लावू शकणाऱ्या ओपन टू इंटरप्रिटेशन वाटू शकेल अशा शेवटामुळे चित्रपट संपल्यावर पुन्हा एकदा नीट,कोणतेही छोटे डिटेल्स मिस न करता पाहायची इच्छा होते. 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे कथा आणि एकंदर चित्रपटाची ट्रीटमेंट स्लो असल्याने सुरुवातीचा तासभर काही घडतंय असं वाटत नाही पण त्यानंतरही अजून थोडावेळ उत्सुकता टिकवून ठेवली तर मात्र प्रत्येक पात्राचं आणि प्लॉटचं  उलगडत जाणं  हळूहळू आपल्याला त्यात एंगेज करतं . मोन्टानाची भूरुपं , विस्तीर्ण माळरानं ,डोंगर (जे न्युझीलंड मध्ये शूट केलय), लँडस्केप  जो अनफरगिविंग वाटतो ,ते सगळे कथेच्या तीव्रतेत भर घालतात. 

फिलची खूप लेअर्स असलेली ग्रे शेडची व्यक्तिरेखा कंबरबॅचनी खूप ताकदीने उभी केलीय.फिलचा पहिल्या फ्रेमपासूनच खलनायकी भासणारा वावर ,एकीकडे केवळ बोलण्यानेही  समोरच्या व्यक्तीला मानसिक पातळीवर आघात करू शकेल इतका तुसडेपणा तर दुसरीकडे स्वतःबद्दलचा अनाकलीय अपराधीपणा त्याच्या प्रत्येक एक्सप्रेशनमुळे अधिक गहिरा होतो. त्याच्याकडे काऊबॉईजचं म्होरकेपण आहे पण तो मनाने  त्यांच्यातला नाही, विचाराने त्यांच्यापेक्षा वेगळा आहे,भावाच्या सर्वसामान्य व्यक्तिरेखेपेक्षा जास्त हुशार  आहे म्हणूनच की काय एकटा आहे.त्याची माचो इमेज ,त्याला ज्या गोष्टींचा अभिमान आहे, त्या खरंच त्याच्या स्वतःच्या  आवडीच्या आहेत की त्याच्या नकळत या गोष्टींवर विश्वास ठेवायला त्याला गॅसलाईट केलं गेलंय ,यामुळे आतून गोंधळला आहे तर बाहेरून तुसडा आहे ,असा विविध कंगोरे असलेला आणि वेगवेगळी वळण घेत जाणारा कॅरेक्टर ग्राफ कम्बरबॅचने खूप ताकदीने उभा केलाय . कदाचित हा रोल त्याला यंदाचं ऑस्करही मिळवून देऊ शकेल. 

Kirsten Dunst नी उभी रोझ सुरुवातीला स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ,विचारांची ,कलात्मकता आवडणारी ते विचित्र परिस्थितीत कोलमडून पडणारी तरीही पूर्णपणे हार न पत्करणारी स्त्री खूप सुंदर उभी केलीय. एका छोट्याशा प्रसंगात जी जॉर्जला डान्स करायला शिकवते त्यात तिची सकारात्मकता खूप सुंदरतेने समोर येते 

पण सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो Kodi Smit-Mcphee चा पीटर. प्रेडिक्टेबल होऊ शकेल असा रोल जेव्हा शेवटी सरप्राईज एलिमेंट बनतो तेंव्हाचे त्याचे सीन्स फारच अप्रतिम आहेत. ज्या चित्रपटाच्या पहिल्या वाक्यातच कथेचं फोरशॅडोइंग केलंय,अशा गोष्टीची परिणमकारकरता शेवटच्या दृश्यापर्यंत टिकवून ठेवणे केवळ त्याच्या अभिनयामुळे शक्य होतं. 

यंदा ऑस्कर साठी १२ नामांकन मिळालेल्या या चित्रपटाला बेस्ट डायरेक्टर या कॅटेगरीतही नॉमिनेमश मिळालं आहे .आणि दुसऱ्यांदा नॉमिनेशन मिळालेल्या 'जेन काम्पियन' पहिल्याच स्त्री डायरेक्टर असाव्यात.

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

रॉकेट बॉईज ( वेबसिरीज - SonyLiv)

रॉकेट बॉईज चा ट्रेलर पहिल्यापासून सिरीज पाहायची फार उत्सुकता होती . जितका ट्रेलर छान वाटलेला तितकीच सिरीजही रंजक वाटली. भारतीय अणु ऊर्जा संशोधनाचे जनक  डॉ होमी भाभा आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही सिरीज या दोन वैज्ञानिकांचं आयुष्य ,त्यांच्या कार्याचे महत्वाचे टप्पे दाखवताना स्वतंत्र भारताच्या विज्ञान,तंत्रज्ञान इतिहासाचा छोटासा आढावाही  घेते. 

पहिला सिझन १९४०-१९६० दरम्यानचा कालावधीत घडताना दाखवला आहे.जिम सरभने साकारलेला होमी भाभांचा रोल आणि ईश्वाक सिंग ने साकारलेला विक्रम साराभाईंचा  रोल मध्ये अतिशय उत्तम प्रकारे जमले आहेत. त्यांच्यातील सुरुवातीचा मेंटॉर-स्टुडन्ट रिलेशनशिप, नंतर मैत्री,वैचारिक देवाणघेवाण ,वाद अशा सर्व प्रसंगांत   दोघांची केमिस्ट्री फार जमलीय. या दोघांव्यतिरिक्त इस्रो च्या सुरुवातीच्या दिवसात डॉ साराभाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे डॉ ए.पी .जे अब्दुल कलाम पाहताना फार छान वाटत. डॉ सी वि रमण यांची व्यक्तिरेखा २-३ छोट्याशा सीन्समधूनही लक्षात राहते

रॉकेट बॉईज  पाहताना जाणवलेल्या काही गोष्टी म्हणजे एखाद्या महत्वाच्या पण लांबलचक अशा कालखंडाला न्याय देऊ शकेल अशी कलाकृती साकारायला वेब सिरीज प्लॅटफॉर्मचा कल्पकपणे उपयोग केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे अनावश्यक भडक दृश्य ,अतिप्रमाणात असलेल्या शिव्या वगैरे टाळूनही चांगली सिरीज बनू शकते.अर्थात या  सिरीज मध्ये एकूण  ३-४ सीन्स मध्ये एफ वर्ड्स आहेत पण अशा टाईपच्या शब्दांचा भडीमार नव्हता ,हे आवडलं. जनरली वेब सिरीज मध्ये शेवटच्या सीनमध्ये पुढचा एपिसोड लगेच बघावा अशी व्यवस्था करू ठेवली असते तसं  काही घडत नाही. अधेमधे संथपणा येतो ,तरीही एका पोएटिक फ्लो मध्ये पुढचा एपिसोड येत राहतो. 

ज्या प्रसंगात विज्ञानविषयक चर्चा आहे त्यांचा क्लिष्टपणा तसाच ठेवून केवळ त्या पात्रांच्या कथेत आपण प्रेक्षक म्हणून गुंतलोय,हे आपल्याला स्वतःलाच कळत आणि म्हणूनच  आपण न कंटाळता बघत राहतो,हे फार आवडलं.वैज्ञानिकांची गोष्ट म्हणून  विज्ञानाशी निगडीत असली तरी साराभाईंच्या व्यक्तिमत्त्वावर,पोशाखावर  ,त्यांच्या संवादात गांधीजींच्या स्वप्नातील भारत येतो,तो सजक स्वप्नाळूपणा इतिहासाच्या पुस्तकातून भेटलेल्या भारावलेल्या गोष्टींची आठवण करून देतो. तर भाभांच्या व्यक्तिरेखेतून महत्वकांक्षा बाळगणं ,ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असणं किंवा जगाबरोबर वागताना त्याच्यासारखंच वागता आलं पाहिजे, अशा आशयाचे व्यावहारिक संवाद पुन्हा वर्तमानात आणतात. 

ब्रिटिश स्टाइलच्या जुन्या इमारती ,पूर्वीच्या कार्स,व्यक्तिरेखांचे कपडे ,अप्रतिम आणि सुटेबल बॅकग्राऊंड म्युझिक ,सुंदरपणे चित्रित केलेल्या फ्रेम्स, छाया प्रकाशाचा सुंदर उपयोग करून चित्रित केलेले व्हिज्युअल्स आणि इतर डिटेल्स मुळे पूर्ण सीरिजला छान सेपिया टोन सेट झालाय तोही आवडला. 

काही काही फ्रेम्स खूप आवडल्या,फार स्पॉयलर न येऊ देता लिहायच्या झाल्या तर कलमांचा इंट्रोडक्शन असलेला प्रसंग ,केम्ब्रिज विद्यापीठावरून  वरून उडणारी दुसऱ्या महायुद्धातली प्लेन्स ,एका फ्रेममध्ये डॉ भाभा,डॉ साराभाई आणि डॉ कलाम महत्वाच्या मिटिंग साठी वाट बघत एकाच सोफ्यावर ओळीत बसले आहेत ती फ्रेम,भाभांचे आणि साराभाईंच्या महत्वाच्या माईलस्टोन दाखवताना बनवलेले ओव्हरलॅपिंग सीन्स,रॉकेटचे वेगवेगळ्या प्रकारे वापरलेले मोटिफ्स असे बरेच प्रसंग लक्षात राहतात. 

दोघांच्या वैयक्तिक आयुष्याचे एक्सट्रा डिटेल्स ,काही प्रसंगांना जास्त ड्रॅमॅटिइज्ड किंवा कॉमेडी करून दाखवणं किंवा शेवटी दुसऱ्या सिझनची तयारी म्हणून की काय कॉन्स्परन्सी थिअरीकडे जाणारा शेवट ,अशा काही बाबी खटकू शकतील .असे असले तरीही भारतीय तंत्रद्याना क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या दोन शास्त्रज्ञांवर एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न म्हणता येईल सिरीज बनते ,हेही नसे थोडके !

जाता जाता आठवलं,आमच्या शाळेत  रमण मंडळाची एक छोटीसी लायब्ररी होती .त्यात शास्त्रज्ञांची ओळख असलेली छोटी छोटी पुस्तक वाचायला मिळायची.कधीतरी डॉ भाभा आणि डॉ साराभाई यांची छोटेखानी चरित्र वाचलेली. त्यांच्या  व्यक्तिरेखांना टीव्हीच्या स्क्रिनवर पाहून पुस्तकातून भेटलेलं  पण ओळखीची असलेले कुणीतरी भेटल्यासारखं वाटलं

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

सिनेमा पॅरॅडीसो - १९८८ (वर्ल्ड सिनेमा)

 

सध्या  टीव्हीवरचे शेकडो चॅनेल्स युट्युब ,नेटफ्लिक्स ,ऑनलाईन स्ट्रीमिंग इ. च्या गर्दीत मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघणं कमी होत आहे.पण एक काळ असाही होता जेव्हा गावातलं  एकुलतं एक पडदा थिएटर हेच लोकांच्या मनोरंजनाचं एकमेव साधन होतं. दर शुक्रवारी कोणता नवा सिनेमा याची वाट लोक बघत असायचे. अशाच एका काळातील कथा सांगणारा एक इटालियन सिनेमा 'सिनेमा पॅरॅडीसो'.

 हे 'सिनेमा पॅराडिसो' म्हणजे इटलीतल्या एका छोट्याशा गावात असणाऱ्या एकमेव थिएटरचं नाव असतं. 

सिनेमा फ्लॅशबॅकने  सुरु होतो. साल्व्हेटर हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. एका रात्री उशिरा घरी परतल्यावर त्याला निरोप मिळतो की त्याच्या गावातील कुणी अल्फ्रेडो नावाचा माणूस मरण पावला आहे. ती बातमी ऐकून साल्वेतर आपल्या बालपणीच्या आठवणींत हरवतो. 

चित्रपटाची कथा म्हणजे नॉस्टेल्जियाचा प्रवास आहे.साल्व्हेटर ६-७ वर्षाचा असताना इटलीतल्या एका छोट्याशा गावात आपल्या आई आणि लहान बहिणीसोबत राहत असतो.त्याला सगळे टोटो म्हणून ओळखत असतात.  नुकत्याच संपलेल्या दुसऱ्या महायुद्धात त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो. घरची परिस्थिती हलाखीची. छोट्या टोटोचा विरंगुळा म्हणजे गावातल्या मुख्य चौकात असणाऱ्या सिनेमा पॅरॅडीसो मध्ये चित्रपट पाहणे. या आवडीतूनच त्याची ओळख अल्फ्रेडोशी होते. अल्फ्रेडो त्या सिनेमागृहात पिक्चर दाखवणारा प्रोजेक्शनिस्ट असतो. हुशार पण अवखळ असलेल्या टोटोला पळवून लावायचा प्रयत्न सुरुवातीला तो करतो पण नंतर त्यांची मैत्री होते आणि तो टोटोला प्रोजेक्शन रूम मधून पिक्चर पाहायची परवानगी देतो. इथून त्यांची मैत्री फार सुरेखपणे उलगडत जाते. 

प्रोजेक्शन रूम मधून चित्रपट पाहता पाहता टोटो चित्रपटाबद्दल तर शिकत जातोच पण काही मजेदार प्रसंगाचाही साक्षीदार बनतो. कोणताही नवा चित्रपट गावात आला कि गावातला धर्मगुरू तो चित्रपट एकट्याने बसून आधी पाहत असे आणि त्या चित्रपटात जर चुंबनदृश्य असेल तर ते अलफ्रेडोला फिल्म मधून कट करायला लावत असे. अशा कट केलेल्या चुंबन दृश्यांचा ढीग प्रोजेक्शन रूम मध्ये पडलेला असे. तो पाहून त्यातली एखादी फिल्म आपल्याला मिळावी यासाठी टोटोने कितीही हट्ट केला तरी त्यातली एकही फिल्म अलफ्रेडो त्याला देत नसे. 

अशी लोकली सेन्सॉर केलेली फिल्म बघायला लोक आले की त्यांचा उमटणाऱ्या प्रतिक्रियाही फार मजेदार असतं. एखादा प्रणय प्रसंग अतिशय रंगलाय असं वाटत असतानाच ते दृश्य कट झालं कि थिएटर मध्ये बसलेली लोक अलफ्रेडोच्या नावाने शिव्यांच्या लाखोल्या वाहत असतं.

पुढे एकदा प्रोजेक्शन रूम मध्ये झालेल्या अपघातात अल्फ्रेडोचे डोळे जातात पण टोटोच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचतो. त्या गावात दुसऱ्या कुणालाही पिक्चर  प्रोजेक्शनची माहिती नसल्याने ६ वर्षाचा टोटो बनतो सिनेमा पॅरॅडीसोचा नवीन प्रोजेक्शनिस्ट तर आता अलफ्रेडो त्याचा मित्र ,मार्गदर्शक बनतो. तो चित्रपटांसोबत आयुष्यातील गोष्टीबद्दलही टोटोबरोबर बोलत असतो. पाहता पाहता १० वर्ष उलटतात. 

टोटो १६-१७ वर्षांचा तरुण प्रोजेक्शनिस्ट आहे.सोबत तो आपल्या छोट्या फिल्म  कॅमेरावर छोटे प्रयोग करत असतो. तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांचं प्रेम फुलतंय असं वाटत असतानाच ती कुटुंबियांच्या दबावाने मागे फिरते . निराश झालेला टोटो मोठ्या शहरात आपला नशीब आजमावायला जातो तेव्हा अलफ्रेडो त्याला आठवणीत न अडकता पूर्ण झोकून देऊन काम करायचा सल्ला देतो आणि पुन्हा कधीच परतून येऊ नकोस म्हणूनही सांगतो. 

टोटो शहराकडे जायला निघतो, तिथे फ्लॅशबॅक संपतो आणि चित्रपट वर्तमानात सुरु होतो. टोटो हा आता साल्व्हेटर आहे , ३० वर्षांनी गावी परत येतो. गावातले छोटे मोठे बदल तो टिपत राहतो. अलफ्रेडो च्या फ्युनरल मध्ये त्याला सिनेमा पॅरॅडीसो मध्ये चित्रपट पाहायला येणारे काही चेहरेही दिसतात.गावातल्या मुख्य चौकात ते येतात तेव्हा कोपऱ्यात सिनेमा पॅरॅडीसो दिसतं. ते पाडून तिथे मॉल उभा राहतोय ,हेही त्याला कुणीतरी सांगतं. 

त्यानंतर तो अलफ्रेडो च्या घरी जातो.अलफ्रेडोची बायको त्याला अलफ्रेडोने त्याच्यासाठी ठेवलेला एका फिल्मचा रीळ देते. गावातून निघून तो शहरात परत येतो.घरी जाऊन ती फिल्म बघतो. तर ती फिल्म असते प्रत्येक फिल्म मधून कट केलेल्या चुंबनदृश्यांचा एक मोंटाज.एका मागोमाग दिसणारे ते प्रेमाचे सीन्स पाहून साल्व्हेटरचे डोळे भरून येतात. इथे चित्रपट संपतो. 

यातल्या अनेक फ्रेम्स फार सुंदर आहेत . एक आवडलेलं दृश्य आठवलं ,टोटो शहरात जायला निघतो ,त्या स्टेशनवरून त्याची ट्रेन हळूहळू दूर दूर होत जाते ,प्लॅटफॉर्मवर त्याला निरोप द्यायला आलेल्या लोकांखेरीज एक छोटा मुलगा थोड्या अंतरावर बसलेला दिसतो, टोटो आपल्यातील निरागसता तिथे सोडून जातोय ,हे तर दिग्दर्शकाला सुचवायचं नसेल?

 वर वर पाहता हा  कुण्या साल्व्हेटरच्या  आठवणी उलगडणारा हा सिनेमा.पण  त्यासोबत बऱ्याच गोष्टींनाही स्पर्श करतो. युद्धानंतरची सामान्य लोकांची स्थिती ,काळानुसार बदलती गावं ,आर्थिक विषमता,तरुणाई ,पहिलं प्रेम इ ,पण सगळ्यात महत्वाची म्हणजे सिनेमाची माध्यम म्हणून परिणामकारकता सिनेमा पॅरॅडीसो च्या प्रेक्षकांच्या रूपाने अधोरिखित होते. सिनेमा पॅरॅडीसोत बसून लोक चित्रपट पाहत आहेत अशी बरीच दृश्ये आहेत. चित्रपटगृहाच्या अंधारात चित्रपट पाहताना लोक आपले प्रश्न विसरून त्या २-३ तासांसाठी चित्रपटाच्या कथेत हरवतात ,ते हसतात ,रडतात ,रागावतात ,चित्रपटातल्या भासमान जगातील भावना जणु स्वतः जगतात,हे सगळं कथेच्या ओघाने बघताना आपणही त्या प्रेक्षकांशी जोडले जातो.

१९८९ च्या बेस्ट फॉरेन सिनेमा या कॅटेगरीत ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब मिळवलेला हा सिनेमा उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी मुळे फार देखणा झालाय.छोट्या टोटो आणि अलफ्रेडोचं काम करणाऱ्या दोन्हीं कलाकारांच्या अभिनयातली सहजता प्रत्येक फ्रेम मधे दिसते. ह्या चित्रपटात  जे पडद्यावरच्या चित्रपटांचे सीन्स वापरले आहेत ,ते त्याकाळचे क्लासिक्स असलेले कुरोसावा ,जॉन वेनचे पिक्चर ,चार्ली चॅप्लिन चे पिक्चर वापरले आहेत,एका दृष्टीने हा चित्रपटाचां ही नॉस्टॅलजिया आहे.

पुढे २००२ मध्ये याच सिनेमाचं डायरेक्त्तर कट व्हर्जन रिलीज झालं,त्यात काही कट केलेले सीन्स आहेत ,त्यात त्याच्या प्रेमकथेचा अधुऱ्या शेवटचा उलगडा होतो ,पण पूर्ण कथेच्या दृष्टीने पहिलं व्हर्जन जास्त परिणामकारक आहे. 
 'क्लासिक फिल्म्स' या कॅटेगरीत गणला जाणारा हा सिनेमा त्यातल्या तांत्रिक बाबींमुळे जितका फिल्म क्रिटिक्स मध्ये आवडता आहे तितकाच साध्या ,सोप्या पटकथेमुळे प्रेक्षकांचाही लाडका आहे. 

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

गली बॉय

 'गली बॉय' पाहिला.फार आवडलाय. रॅप म्युझिक ,या जॉनर बद्दल फारसं काही माहित नव्हतं पण झोया अख्तर ,रणवीर सिंग आणि आलीया भट ,हा सगळं कॉम्बो ट्रेलर मधे इंटरेस्टिंग वाटल्याने हा सिनेमा पाहायचा,हे ठरवलं होतच.कथेबद्दल प्रोमो पाहून कल्पना आलेली. डिव्हाईन आणि नेझी या दोन रॅपर्स च्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे ,हे प्रोमो पाहता पाहता खालच्या कमेंट्स वाचून समजलेलं.


स्टोरीलाईन प्रोमोत वाटते तशीच प्रेडिक्टेबल आहे. मुंबईत धारावीमधे राहणाऱ्या मुराद नावाच्या एका सामान्य मुस्लिम मुलाच्या सुरुवातीच्या स्ट्रगलपासून ,त्याला आपल्या पॅशनचा लागलेला शोध आणि आसपासच्या वातावरणातून वाट काढत ,त्याचा रॅप स्टार होण्यापर्यंतचा प्रवास,अशी कथा आहे. सध्या बायोपिक्सचा जमाना असल्याने अशा आशयाचे बरेच पिक्चर आले आहेत. पण गली बॉय सादरीकरणामुळे वेगळा वाटला .मेन स्टोरी लाइन सोबत अनेक वेगवेगळे सब ट्रॅकसचे लेअर्स आहेत ,त्या प्रत्येक स्टोरीबद्दल आपण नकळत विचार करत राहतो. मुरादच्या घरातलं ,आसपासचं वातावरण, त्याचे मित्र , रॅपर्स क्लब्ज ,त्यांच्या स्पर्धा हे तर आहेच .सोबत 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातली दरी ,शहरीकरणाचा भाग म्हणून वाढत जाणाऱ्या झोपडपट्या ,त्यातलं जीवन,एका पॉइंटवर अपरिहार्य वाटणारी गुन्हेगारी हे कोणताही मेलोड्रामा न दाखवता ,नेहमीचे घासून गुळगुळीत झालेले सीन्स न दाखवता फार साधेपणाने समोर येत पण तितकंच परिणामकारक वाटत. झोया अख्तरची सटल स्टेटमेंट करायची स्टाईल नेहमीप्रमानेच क्लासिक आहे.

सिनेमा मुंबईत घडत असला तरी नेहमीची मुंबई कुठेच दिसत नाही .दिसते ती उंच उंच बिल्डींग्सच्या मधून दिसणाऱ्या झोपड्यांची रांग,लहान लहान गल्ल्या त्यातली एकमेकांना घट्ट चिकटून असलेली घर,रात्रीची मुंबई ,त्यावेळचे शांत रस्ते, या सगळ्याचं पण एक कॅरॅक्टर आहे ,असं वाटलंत होतं.

रणवीर तर त्याची व्यक्तिरेखा जगलाय असं वाटावं इतका प्रामाणिक वाटतो.ज्या प्रसंगात त्याला डायलॉग्स नाहीत त्यातही तो केवळ डोळ्यांनी आणि बॉडी लँग्वेजने बोलतो. त्याच्या व्यक्तिरेखेचं व्यक्त होणं ,बुजलेपणा,ताण सगळं फार आश्वासकपणे मांडतो . त्याने स्वतः गायलेले रॅप सॉंग्स ऐकणं आणि त्या गाण्यात पडद्यावर पाहणं.अगदी ट्रीट आहे. आलिया आणि त्याची केमिस्ट्री तर अप्रतिमच. आलिया तिच्या कॅरॅक्टरमधे एकदम परफेक्ट वाटलीय.तिचे आणि रणवीरचे सुरुवातीचे काही सीन्स फार भारी वाटतात.सपोर्टींग कॅरॅक्टरमधे mc शेरच्या रोल मधला सिद्धांत चतुर्वेदी फारच प्रॉमिसिंग वाटला. इतर सगळे सपोर्टींग कास्ट मधले कलाकार पण बेस्ट आहेत.
डिव्हाईन आणि नेझीच ओरिजिनल रॅप सॉंग 'मेरे गली मे ' ,ते यात रिक्रिएट केलंय ,ते तर मस्तच आहे आणि शेवटचं 'अपना टाइम आयेगा' पण भारीय.

काही काही सीन्स फार मस्त जमलेत. रणवीरचा एंट्री सीन ,तो ड्रॉयव्हर म्हणून एका गाडीत बसून राहिलेला आहे आणि त्या गाडीवर बाजूच्या बिल्डींगच्या रोषणाईचे लाईट्स पडलेत ,तो सीन. 'एक रेट्रो स्टाईलचं स्लो सॉंग आहे ,'जीने में आये मजा ' ते ऐकायला आणि त्याचं चित्रीकरण पण फार छान आहे.

पोस्टमेन इन द माउंटन्स (world cinema)


 

संवादाची अनंत माध्यमे असताना उपलब्ध असण्याच्या सध्याच्या जमान्यात पत्रं आणि ती पोहोचवणारा पोस्टमन दुर्मिळ होतोय. याचं पोस्टमनला केंद्रस्थानी ठेऊन बनवलेला एक चायनीज चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला, द पोस्टमन इन द माऊंटन नावाचा.चित्रपटाची गोष्ट  साधीशीचं ;चीन मधल्या हुनान पर्वतराजीतल्या छोट्या  गावांत पत्र पोचवणाऱ्या एका पोस्टमनची आणि त्याच्या तरुण मुलाची.


हा पोस्टमन आयुष्यभर डोंगरातून चढउतार करत, पायी चालत छोट्या छोट्या गावात पत्रं वाटत आलाय.ही गावं अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली असतात,जिथे जायला थेट रस्ताही नसतो,त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायी चालत पत्रांचा बटवडा करणे हे काम त्याने अतिशय प्रामाणिकपणे केलंय. ह्या पर्वत भागात सततच्या चढउतार करण्याने त्याला गुडघेदुखी सुरू होते आणि तो निवृत्त होणार असतो,त्याच्या जागी त्याच्या तरुण मुलास घ्यावे असं तो सुचवतो.


चित्रपट सुरू होतो तेंव्हा त्याचा मुलगा पत्रं वाटायच्या पहिल्या प्रवासास निघालाय आणि त्याला रस्त्याची,कामाची ओळख करून द्यावी म्हणून पोटमन वडीलही सोबत निघतो.सोबतीला त्याचा नेहमीचा सोबती कुत्राही घेतो.अशा या वडील आणि मुलाच्या प्रवासाची गोष्ट हा चित्रपट उलगडतो.
आठवड्याचे चार दिवस पाठीशी पत्राचं भलंमोठं गाठोडं बांधायचं,उंचच्या उंच डोंगर चढून जायचा,त्यावरच्या प्रत्येक गावात पत्रं पोहोचवायची ,नवीन पत्रं गोळा करून, पुन्हा तो डोंगर उतरून खाली गावात यायचं ,हे काम करण्याबद्दल मुलगा फार उत्सुक नसतो,तर वडील त्याला कामाची माहिती देण्यास प्रचंड उत्साही असतो.
पण हा केवळ त्यांच्या कामाचं स्थित्यंतर एवढाच प्रवास नसतो तर  वडील आणि मुलाचं नातं उलगडणार प्रवास आहे.पोस्टमनच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला कधी मुलासोबत निवांत वेळ घालवता आलेला नसतो,आणि मुलालाही आपल्या वडीलांबद्दल फार माहिती नसते,ह्या प्रवासात ते एकमेकांना नीट ओळखू लागतात,त्यांच्यातले परस्परांबद्दल असलेले गैरसमज दूर होतात.
त्यांना वाटेत भेटणारी गावं, त्यातली साधी माणसं, त्यांचं राहणीमान,पोस्टमन बद्दल जगाशी जोडणारा एकमेव दुवा म्हणून असणारं कौतुक तसेच पोस्टमनचं आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन गावकऱ्यांना मदत करणं फार सुंदरपणे समोर येतं.
वडील आणि मुलाच्या गप्पातून दोन पिढ्यांच्या विचारातला फरक नेमकेपणाने दिसतो.मी क्षणभर विसरूनच गेले की आपण परदेशी सिनेमा पाहतोय ,इतकं प्रातिनिधिक विचार होता तो.जुन्या पिढीचा सचोटीचा पराकोटीचा आग्रह,तर नवीन पिढीची व्यावहारिकता,वेगाचं वेड,असं सगळं त्यांच्या गप्पांतून उलगडत जातं. वडील आणि मुलाला जोडणारा एकमेव दुवा म्हणजे त्या पोस्टमनची बायको,तिची गोष्ट,तिचा आयुष्यभराचा संघर्ष हेही त्यांच्या गप्पातून भेटतं.


लक्षात राहण्यासारखे बरेच प्रसंग आहेत ह्या सिनेमात,त्यातला एक प्रसंग म्हणजे जोराचा वारा येऊन पत्रं उडायला लागतात आणि पोस्टमन जिवाच्या आकांताने ती गोळा करायला धावू लागतो,तेंव्हा त्याच्या मुलाला जाणीव होते की हे फक्त वडिलांचं काम नव्हतं तर हे त्यांचं आयुष्य होतं, म्हणूनच बहुतेक स्वतःचा वारसा पुढे चालवायला त्याने  आपल्या मुलाची निवड केलीय.


दुसरा प्रसंग म्हणजे,वाटेत त्यांना एक नदी लागते, ती पार करायला मुलगा वडिलांना पाठकुळी घेतो आणि नदी पार करतो,तेंव्हा वडीलाला जाणीव होते की आपला मुलगा आपल्या नकळत मोठा आणि जबाबदार झालाय.
ह्या कथेच्या बॅकड्रॉपला असलेल्या चीन मधल्या दुर्गम पर्वतराजीची चित्रीकरण अफाट सुंदर झालय,सिनेमात कुठेच मेलोड्रामा नसल्याने आपण एखाद्या खऱ्याखुऱ्या वडील मुंलाच्या जोडी सोबत प्रवासास निघालोय अशी जाणीव होतं राहते.
सिनेमात कुठेही कालखंडाचा उल्लेख नाहीय पण रेडिओवर ऐंशीच्या दशकातील पॉप सॉंग ऐकू येत,तोच कालखंड असावा, तीच गोष्ट त्यांच्या नावांची. सिनेमात कुठेही पोस्टमनचं आणि त्याच्या मुलाचं नाव येत नाही.आवश्यक नसलेले डिटेल्स टाळण्याचा हे वेगळेपणही सिनेमा नेटका बनवतं.
एक अतिशय साधा पण सुंदर सिनेमा पाहिल्याचं समाधान हा चित्रपट पाहताना मिळालं.


--------------------------------------------
मित्रमंडळ कट्टा बंगलोर च्या ब्लॉग वर पूर्वप्रकाशित